परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

     मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्तीसाठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले असून इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केले आहे.

    परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीच्या नियमानुसार असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. यासह इतर अटी आहेत. अर्जाचा नमुना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. २३ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.