मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वितरण
नाशिक : आजच्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धे च्या काळात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून महाज्योतीच्या माध्यमातून आधुनिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमात महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील १२२ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तनुजा भालेराव, नंदिनी वाकारे, गायत्री पुंड, दानीज शेख, सूरज परदेशी, सूरज परदेशी व रोहिणी मिस्त्री या विद्यार्थ्यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. महाज्योती संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत दररोज सहा जीबी इंटरनेट डेटाची सुविधा नीट परीक्षा होईपर्यंत साधारण दीड वर्षे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विविध शैक्षणिक सुविधांची माहिती देखील महाज्योती संस्थेचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी प्रास्ताविकात सांगितली.