महाज्योतीचा उपक्रम : दररोज सहाजीबी इंटरनेट डेटाही मोफत
वर्धा : महाज्योतीकडे नोंदणी केलेल्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन सुरु असलेल्या या प्रशिक्षणाकरिता नोंदणीकृत विद्यार्थ्यांना राज्यभरात मोफत टॅब वितरित केले जात आहेत. वर्धा जिल्ह्यातील १२६ ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले असून, दररोज सहा जीबी इंटरनेट डाटाही मोफत मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एकाच शाळेतील ५१ विद्यार्थिनींचा सहभाग .
या टॅब वाटप कार्यक्रमात अल्लीपूर येथील इंदिरा गांधी कन्या कनिष्ठ महावि द्यालयातील प्राचार्य अर्चना मुडे यांनी वर्धा जिल्ह्यात एकाच शाळेतील ५१ विद्यार्थिनींना या प्रशिक्षण योजनेत सहभागी करुन घेतले. तसेच त्या विद्यार्थिनींना मोफत टॅबचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशाल हजारे, प्रभाकर धोटे, प्रथमेश हांडे, रोहित ताजने, श्याम जगताप, योगेश खोडे तसेच समाजकल्याण विभागाचे अधीक्षक अंकेश केदार, सचिन राऊत, किरण बोरकुटे, प्रेमलता बुरंगे व यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
जेईई नीट, सीईटी २०२३ साठी अशाच प्रकारची ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबसाठीच्या योजनेची नोंदणी महाज्योतीच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. तरी यावर्षी ११ वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती.