सांगली: महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने सांगलीतील विश्रामबाग येथील माहेश्वरी गार्डन मल्टीपर्पज हॉलमध्ये दोन दिवशीय राज्य कार्यकारणी बैठकीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्रातील तब्बल २० जिल्ह्यांतून २०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
बैठकीच्या पहिल्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या हस्ते दीप्रज्वलन व उद्घाटन सोहळ्याने झाली. याप्रसंगी अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, गणेश कांबळे, निवृत्त शिक्षणाधिकारी तथा कादंबरीकार नामदेव माळी, तसेच सांगली जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. पाटील यांसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चळवळीच्या दस्तावेजीकरणावर विशेष भर देण्यात आला. या बैठकीत चळवळीच्या दृष्टीने अत्यंत मोलाच्या ठरणाऱ्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये प्रा. किसनराव कुराडे लिखित 'नरेंद्र दाभोलकरांना निमंत्रण पत्र', तसेच प्रा. गौतम निकम आणि वैशाली निकम यांचे 'आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचा सहभाग' आणि 'नाशिक जिल्ह्यातली आंबेडकरी चळवळ (खंड २)' या पुस्तकांचा समावेश आहे. चळवळीचे काम भविष्यातील पिढ्यांपर्यंत अचूक पोहोचावे यासाठी अशा प्रकारच्या दस्तावेजीकरणाची नितांत आवश्यकता असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. याशिवाय प्रा. किसनराव कुराडे यांना विशेष 'कृतज्ञता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे 'माध्यमांचे वर्तमान' या विषयावरील जाहीर व्याख्यान. प्रसारमाध्यमांचा उज्ज्वल ऐतिहासिक प्रवास, बाळशास्त्री जांभेकरांचे 'दर्पण' वृत्तपत्र, स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळक व आगरकरांचे कार्य यापासून ते आजच्या सोशल मीडिया व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगापर्यंतच्या बदलांवर त्यांनी सखोल भाष्य केले. तसेच सत्यशोधक समाजाच्या प्रभावाखालची ब्राह्मणेतर पत्रकारिता आणि विशेषतः 'शोध पत्रकारिता' या दृष्टीकोनाने राज्य, जिल्हा आणि जागतिक पातळीवर मोठ्या गोष्टी समोर आणल्या. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आणि माहिती अधिकाराच्या अस्त्रामुळे सरकारी पातळीवरच्या अनेक बाबी चवाट्यावर आल्या होत्या हेही त्यांनी नमूद केले. पत्रकारितेतील बदललेली मूल्ये, बातम्यांमध्ये वाढलेली व्यावसायिक व राजकीय भेसळ आणि लोकशाहीत माध्यमांसमोर उभी ठाकलेली आव्हाने यावर त्यांनी उपस्थितांशी विस्तृत संवाद साधला.
दुपारच्या सत्रात अंनिसच्या विविध विभागांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व आगामी दिशा ठरवण्यासाठी चर्चा सत्र पार पडले. दिवसभराच्या वैचारिक मंथनानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या 'नवीन चमत्कारांचे वैज्ञानिक सादरीकरण' पार पडले, ज्यास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला. रविवारी सांगलीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निटवे यांचे 'भ्रामक गर्भसंस्कार' या विषयावर विशेष व्याख्यान आणि समारोप सत्राने बैठकीची सांगता होणार आहे.