आजकाल ‘अभिजात मराठी’चा गजर सुरू आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करणे वेगळे आणि त्या भाषेचे खरे आकलन असणे वेगळे. दुर्दैवाने, आपल्या माध्यमविश्वात या दोन गोष्टींची सरमिसळ झाली आहे. भाषेच्या नावाने ढोल बडवणारे अनेक पत्रकार प्रत्यक्षात मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीपासून, तिच्या वाक्प्रचारांपासून, तिच्या सांस्कृतिक संदर्भांपासून आणि तिच्या भाषिक परंपरेपासून किती तुटलेले आहेत, हे 'मुंबई तक' आणि तत्सम माध्यमांतील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमधूनच उघड होत असते. प्रसिद्ध संस्कृत श्लोक माहित नसणे हे काही अभिमानाचे लक्षण नव्हे. त्यासाठी प्रत्येक पत्रकार संस्कृतचा अभ्यासक असायलाच हवा असेही नाही. परंतु ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक परंपरेशी संबंधित व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, त्याने किमान त्या विषयाची पूर्वतयारी करावी, एवढी अपेक्षा करणे गैर नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मराठीतील प्रचलित आणि अर्थपूर्ण शब्द समजून घेण्याची कुवत पत्रकाराकडे असावी. ‘शर्करावगुंठीत’ यांसारखा मराठीतील अर्थवाही शब्द ऐकून त्याचा संदर्भ समजत नसेल, तर ‘अभिजात मराठी’च्या गौरवाची भाषणे देणाऱ्यांनी स्वतःच्या भाषिक दारिद्र्याकडेही एकदा पाहायला हवे.

भाषेचे ज्ञान म्हणजे केवळ शुद्धलेखनाच्या दोन-चार चुका न करणे नव्हे. भाषा म्हणजे शब्दांचा अर्थ, शब्दामागचा सांस्कृतिक संदर्भ, वाक्यरचनेतील सूक्ष्मता, उपरोध ओळखण्याची क्षमता, प्रतिमा आणि रूपक समजण्याची ताकद आणि समोरचा माणूस नेमके काय म्हणतो आहे हे ऐकून घेण्याची बुद्धी. पत्रकाराच्या हातात कॅमेरा आणि ध्वनिमुद्रक यंत्र असणे पुरेसे नाही; त्याच्या डोक्यात योग्य प्रश्न असणेही आवश्यक आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्या प्रश्नामागे विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पण हल्ली अनेकदा मुलाखत गंभीर संवाद न राहता मुलाखत घेणाऱ्याची फिरकी घेण्यासाठी खिदळण्याचा कार्यक्रम झाला आहे की काय असे वाटायला लागणारी परिस्थिती आहे. समोरचा एखादा गंभीर सामाजिक, वैज्ञानिक, वैचारिक किंवा भाषिक मुद्दा मांडत असताना पत्रकारांनी त्याच्याकडे छद्मी चेहऱ्याने पहात खिदळणे, एकमेकांकडे पाहून कुत्सीतपणे हसणे, विषयाचे गांभीर्य कमी करण्यासाठी अर्धवट विनोद करणे किंवा वक्त्याच्या भूमिकेकडे जणू काही मनोरंजन म्हणून पाहणे, ही पत्रकारिता नव्हे. याला उथळ आणि उठवळ टिंगलटवाळी करणे म्हणतात. प्रश्न विचारण्याच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणणे आणि त्याच्या विचारांची चिकित्सा करण्याऐवजी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर किंवा व्यक्तिमत्त्वावर हसणे, हा पत्रकारितेचा बौद्धिक पराभव आहे.
विशेषतः एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताना पत्रकाराने दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात—एक म्हणजे प्रश्न विचारणारा हा सर्वज्ञ नसतो आणि दुसरे म्हणजे मुलाखत देणारा हा विदूषक नसतो. पत्रकाराचे काम समोरच्याला बोलते करणे, त्याच्या भूमिकेतील अंतर्विरोध शोधणे, त्याला प्रतिप्रश्न करणे, पुरावे मागणे आणि वाचक किंवा प्रेक्षकाला विषय समजावून देणे हे आहे. त्याऐवजी प्रश्नच उथळ असतील, प्रश्नांमध्ये विषयाचे प्राथमिक ज्ञानही दिसत नसेल आणि समोरचा गंभीरपणे बोलत असताना मुलाखतकारच खिदळत असेल, तर त्या कार्यक्रमातून समोरच्या व्यक्तीपेक्षा पत्रकारांचे अज्ञान अधिक ठळकपणे समोर येते. ‘मुंबई तक’च्या मुख्य संपादकापासून त्यांच्या टोळीतील इतर काही पत्रकारांमध्ये दिसणारी ही वृत्ती म्हणूनच केवळ भाषेची समस्या नाही; ती पत्रकारितेच्या संस्कारांची समस्या आहे. ज्यांना प्रमाण मराठी भाषा म्हणजे नेमके काय, भाषेतील शब्दांचा नेमका अर्थ काय, एखाद्या वाक्प्रचारामागचा संदर्भ काय आणि एखादा वक्ता नेमका कोणता वैचारिक मुद्दा मांडतो आहे हे समजून घेण्याची गरज वाटत नाही, त्यांनी ‘अभिजात मराठी’चा जयघोष करणे म्हणजे घरात पुस्तकांचा गठ्ठा ठेवून एकही पुस्तक न वाचता स्वतःच्या वाचनसंस्कृतीचा टेम्भा मिरवण्यासारखे आहे.
पत्रकाराला प्रत्येक शब्द माहित असणे अपेक्षित नाही; पण शब्द माहित नसल्याचे भान असणे अपेक्षित आहे. एखादा शब्द कळला नाही तर त्याचा अर्थ विचारता येतो. एखादा संदर्भ माहित नसेल तर पूर्वतयारी करता येते. एखादा श्लोक माहित नसेल तर त्याचा संदर्भ शोधता येतो. परंतु माहितीचा अभाव लपवण्यासाठी खिदळणे, विषयाची खिल्ली उडवणे किंवा प्रश्नाला विनोदी वळण देणे हा अत्यंत सोपा आणि बौद्धिकदृष्ट्या आळशी मार्ग आहे. पत्रकारितेतील सर्वांत मोठी समस्या अज्ञानाबद्दलची बेफिकिरी आहे. ज्याला स्वतःलाच काही माहित नाही, आणि माहित करून घेण्याची इच्छाही नाही, तो पत्रकार प्रश्न विचारत नाही; तो केवळ आवाज करतो. आणि जेव्हा अशा पत्रकारांच्या हातात माध्यमाचे व्यासपीठ येते, तेव्हा प्रेक्षकाला माहिती मिळत नाही; आणि दिसते ते पत्रकारांच्या अज्ञानाचे सार्वजनिक प्रदर्शन.
गंभीर विषयावर बोलणाऱ्या व्यक्तीकडे विकृत विनोदी वृत्तीने पाहणे ही हलक्या वृत्तीची पत्रकारिता झाली. गंभीरता म्हणजे चेहरा कायम गंभीर ठेवणे नव्हे, हेही खरे; पण विनोद आणि उपहास यांच्यातील फरक समजणे ही पत्रकाराची प्राथमिक जबाबदारी आहे. समोरचा विचार मांडत असताना त्यातील विसंगती दाखवण्यासाठी विनोद केला तर तो पत्रकारितेचा भाग ठरू शकतो. परंतु विषय समजून न घेता वक्त्याच्या गांभीर्यावरच हसणे म्हणजे स्वतःच्या बौद्धिक उथळपणाचे प्रदर्शन करणे होय. या पत्रकारांच्या अशा उथळ कृतींना विद्यानंद बापटांनी मात्र चोख उत्तरे देऊन मूळ मुद्दा भरकटू दिला नाही, हे त्यांचे कौशल्य.
आज माध्यमांमध्ये आवाज मोठा झाला आहे; आणि भाषेची खोली कमी झाली आहे. कॅमेरे अधिक झाले आहेत; त्याच वेळेस अभ्यास कमी झाला आहे. थेट प्रक्षेपण वाढले आहे; पण पूर्वतयारी कमी पडते आहे. प्रश्नांची संख्या वाढली आहे; पण प्रश्नांची गुणवत्ता घटली आहे. पत्रकाराला बोलण्याची घाई असते; त्याची ऐकण्याची सवय मात्र कमी होत चालली आहे. परिणामी मुलाखत ही विचारांची देवाणघेवाण न राहता खिदळण्याचा, मध्येच तोडण्याचा आणि स्वतःचे अज्ञान झाकण्याचा कार्यक्रम बनतो.
‘अभिजात मराठी’चा खरा सन्मान करायचा असेल तर प्रथम त्या भाषेतील शब्द समजून घ्यावे लागतील. तिची परंपरा वाचावी लागेल. तिच्या संतसाहित्यापासून आधुनिक वैचारिक साहित्यापर्यंतचा प्रवास समजून घ्यावा लागेल. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करावा लागेल. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाषा ही विचार करण्याच्या पद्धतीत असते, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत असते आणि दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्याच्या क्षमतेत असते, हे लक्षात ठेवावे लागेल. म्हणून प्रश्न अधिक गंभीर आहे. ज्या माध्यमकर्मींना भाषेचा अर्थ, संदर्भ आणि गांभीर्य समजत नाही, ते समाजाच्या विचारविश्वाचे प्रतिनिधित्व करण्याच्या योग्यतेचे आहेत का? अभिजात मराठीचा जयघोष करणाऱ्या पत्रकारांनी आधी स्वतःच्या भाषिक आणि बौद्धिक दारिद्र्याकडे पाहावे. कारण पत्रकारिता ही खिदळवृत्ती नाही; ती प्रश्न विचारणारी आणि बौद्धिक कस पाहणारी वृत्ती आहे. ज्यांना प्रश्न कसे विचारायचे हेच माहीत नाही, त्यांनी किमान एवढे तरी लक्षात ठेवावे की मायक्रोफोन हातात आला म्हणून पत्रकारिता करण्याची अक्कल आली असे नव्हे.
(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)