डॉ. मुखर्जींच्या कर्तृत्वावर बोलण्याचे आव्हान भाजप नगरसेवकांना पेलवेना !

पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत गदारोळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हानानंतर सत्ताधाऱ्यांची कोंडी

तैलचित्र लावण्याचा ठराव मांडला, पण संस्थापकावर बोलण्यास टाळाटाळ; अमोल बालवडकर यांच्या गुगलीने भाजप नगरसेवक निरुत्तर

     पुणे, दि. २५: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने देशभरात राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत मंगळवारी चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. डॉ. मुखर्जी यांच्या नावाने केवळ तैलचित्र लावण्याचा ठराव मांडण्यापेक्षा, सभागृह नेते आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रत्यक्ष कर्तृत्वाविषयी सभागृहात किमान ५ ते १० मिनिटे भाषण करून दाखवावे, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिले. मात्र आपल्याच पक्षाच्या विचारधारेशी संबंधित असलेल्या या नेत्यावर पाच मिनिटेही सविस्तर बोलण्याची तयारी उपस्थित भाजप नगरसेवकांकडे नसल्याचे स्पष्टपणे उघड झाले. यानंतर या आव्हानाला थेट उत्तर देण्याऐवजी भाजप नगरसेवकांनी माफीची मागणी, निषेध आणि गदारोळ करत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

Dr Mukherjinchya Kartutvavar Bolnyache Avhan BJP Nagarsevak Pelvu Shakle Nahi

     पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तैलचित्र महापालिकेच्या इमारतीत लावून त्यांची जयंती दरवर्षी साजरी करण्यात यावी, असा मूळ प्रस्ताव (विषय क्रमांक १६५) सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभागृहासमोर मांडला होता. यावर चर्चा सुरू असताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपरोधिक पद्धतीने हे आव्हान दिले, ज्यामुळे उपस्थित भाजप नगरसेवकांची काही काळ बोलतीच बंद झाल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये अशीही चर्चा रंगली की, एरवी हिंदुत्व आणि आपल्या विचारसरणीविषयी सातत्याने भाष्य करणाऱ्या भाजपच्या एकाही नगरसेवकाला त्या क्षणी आपल्याच पक्षाच्या मूळ संस्थापकांविषयी दहा मिनिटे अभ्यासपूर्ण भाषण करण्याचे धाडस दाखवता आले नाही.

     आपली या मुद्द्यावर कोंडी झाल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवकांनी 'महापुरुषांची चेष्टा केली जात आहे' असा आरोप करत या संपूर्ण प्रसंगावर तीव्र आक्षेप नोंदवला. प्रत्यक्ष भाषण करण्याऐवजी त्यांनी घोषणाबाजी करणे, या मुद्द्याचा निषेध करणे आणि माफीची मागणी करणे यांसारखे मार्ग अवलंबले, ज्यामुळे सभागृहात काही काळ मोठा गदारोळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.