कोल्हापूर : सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने तातडीने सुतार समाजाचा भटक्या-विमुक्त जमाती (एन.टी.बी.) प्रवर्गामध्ये समावेश करावा, अशी ठाम मागणी ज्येष्ठ समाजनेते व्ही. डी. लोहार यांनी केली. सुतार-लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समाज प्रबोधन व संघटन बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

बैठकीत बोलताना व्ही. डी. लोहार यांनी सांगितले की, सुतार समाज आजही अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी समाजामध्ये जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजबांधवांनी एकत्र येऊन संघटित पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक असून, भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समावेशासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. समाजाची ताकद संघटनेत असून, एकीच्या बळावरच न्याय्य मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ नेते नारायण निट्टूरकर यांनीही समाजाला मार्गदर्शन केले. त्यांनी सुतार-लोहार समाजाची सद्यस्थिती मांडताना सांगितले की, अनेक कुटुंबे अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत. समाजातील तरुणांना उच्च शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकजूट आवश्यक आहे. समाजातील अंतर्गत मतभेद दूर करून सर्वांनी विकासाच्या समान ध्येयासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटक दिगंबर लोहार यांनी आपल्या भाषणात भटक्या-विमुक्त प्रवर्गाच्या सवलतींमुळे लोहार समाजामध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोहार समाजाचा भटक्या प्रवर्गात समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मोठ्या प्रमाणावर सवलती मिळतात. तसेच शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध होत असल्याने समाजातील शैक्षणिक प्रगती लक्षणीयरीत्या वाढली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक युवकांनी उच्च शिक्षण घेऊन शासनाच्या विविध विभागांमध्ये उच्च पदे प्राप्त केली आहेत.
दिगंबर लोहार पुढे म्हणाले की, सुतार आणि लोहार या दोन्ही समाजांमध्ये अनेक वर्षांपासून रोटी-बेटी व्यवहार सुरू आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक नातेसंबंधांच्या आधारे या समाजांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे सुतार समाजाचाही भटक्या-विमुक्त प्रवर्गात समावेश होणे ही काळाची गरज असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
बैठकीत नारायण सुतार, राजाराम सुतार आणि दत्तात्रय सातार्डेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी समाजातील युवकांना संघटित होण्याचे आवाहन करताना सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.
या बैठकीस राधा मेस्त्री, रूपाली सातार्डेकर, सुधाकर सुतार, सदाशिव सुतार, प्रफुल्ल लोहार, सुखदेव सुतार, सचिन सुतार, विठ्ठल सुतार, के. आर. सुतार, शर्वरी सुतार, विनायक सुतार, दत्ता सुतार, नामदेव सुतार, बाळासाहेब लोहार, निट्टूरकर, रामदास सुतार, कृष्णा सुतार, ज्ञानेश्वर सुतार, मारुती सुतार यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिन सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर रूपाली सातार्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीत सुतार समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, आगामी काळात समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.