डियर आनंद,
कर्नाटकचा 'राष्ट्रीय बसव पुरस्कार' तुम्हाला प्रदान करण्यात आला ही बातमी ऐकून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. या देशाला लागलेल्या जातीव्यवस्था नामक सनातन रोगाची बदलत्या वास्तवासह आपण जनतेला ओळख करून दिली. जातिव्यवस्था अंताचा व्यवहारिक रोड मॅप सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुक्ती प्रतीकाचे दैवीकरण व ब्राह्मणीकरण होत असताना डॉ. आंबेडकरांच्या समग्र विचार- व्यवहार आणि जीवन संघर्षाची फेरमांडणी करून आपण जातीव्यवस्था अंताच्या लोकशाही क्रांतीचे चक्र गतिमान केले.
एका राज्यातील फॅसिस्ट राजवटीने तुम्हाला देशद्रोही आणि दहशतवादी सांगून तुरुंग कोठडीत सडवलं. पण जामिनावर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कर्नाटक सरकार तर्फे 'बसव राष्ट्रीय पुरस्कार' माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणे ही घटना आजच्या अंधार युगातील एक छोटीसी प्रकाशाची किरण म्हणून पाहता येते. बाराव्या शतकातील जातीस्त्रीदास्य व्यवस्था विरोधातील विद्रोही जननायक बसवेश्वर यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार दहशतवादाच्या आरोपात अडीच वर्षे तुरुंगात घालवून आलेल्या तुम्हाला मिळणे म्हणूनच ही एक अपूर्व अशी घटना आहे. सत्ताधारी वर्गामध्ये ही एक छोटा वर्ग हिंदुत्व ब्राह्मणी फॅसीझम विरोधात एक खंबीर भूमिका घेऊन हळूहळू उभा होताना दिसतो आहे. हेच या सोहळ्यानिमित्ताने दिसून आले. जात वर्ग स्त्रीदास्यअंताच्या व फॅसीझम विरोधात लढणाऱ्या शक्तींचा एक महाप्रभाव बनेल अशी अपेक्षा या सोहळ्यातून जागी झालेली आहे. म्हणून तुम्हाला मिळालेल्या या पुरस्काराचे आम्हाला अनन्य महत्व वाटते.
आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेकानेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. पुरस्कारासाठी वा पुरस्कारामुळे हुरळून जाऊन भरकटताना तसेच भूमिका ऍडजस्ट करून सेटल होताना कैक लोकांना पाहिलेलं आहे. मात्र तुम्ही या जा वर्ग स्त्री दास्य अंताच्या संघर्ष भूमीत पाळंमूळं खोल रोवून असलेल्या स्व-अस्तित्वाला कधीच हवेत जाऊ दिलेलं नाहीये. तुमच्या भूमिकांमधला, विश्लेषणामधला क्रांतिकारी प्रगल्भ रॅडिकलपणा तुम्ही कधीच ऍडजस्ट केलेला नाहीये. तेव्हा आत असो वा बाहेर, अविचल निष्ठेने कार्यरत असणाऱ्या डॉ. आनंद तेलतुंबडे या आमच्या सहआरोपीस 'बसव राष्ट्रीय पुरस्कार' मिळाल्याबद्दल आम्हा 'एल्गार परिषद' खटल्यातील बंद्यांकडून क्रांतिकारी सदिच्छा व अभिनंदन!
- BK-7
(तळोजा मध्यवर्ती कारागृह)
2 फेब्रुवारी 2024