मुक्ती कोन पथे ?
Mukti Kon Pathe book writer Dr B R Ambedkar
मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिद्धांत तुम्हा सर्वाना कबूल करावा लागेल. व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून, राहाल तर तुम्हाला या जुलुमाचा प्रतिकार करता यावयाचा नाहीं तुमच्यात सामर्थ्य नसल्यामुळे तुमव्यावर जोरजुलूम होतो याबद्दल मला काडीचा ही संशय नाही या इलाख्यात तुम्हीच अल्पसंख्यक आहात अशातला काही भाग नव्हे. तुमच्या प्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्यक आहेत ज्याप्रमाणे महारमांगांचा दोन चार घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांची ही एक - दोनच घरे गावात असतात. त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाही परंतु तुमच्यावर मात्र सारखा जुलूम चाललेला असतो. याचे कारण काय ? दोन मुसलमानांची घरे असून त्यांच्या वाटेला गाव जात नाही. तुमची दहा घरे असून ही गाव तुमचा छळ करतो. असे का होते ? हा प्रश्न अत्यंत महल्वाचा आहे. त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे. माझा मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे कि त्या दोन मुसलमानांच्या घरांच्यासाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे, याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्यां दोन मुसलमान घरांच्या वाटेस जाण्याची कोणाही हिंदूची सहसा छाती होत नाही. त्या दोन घरांच्या वाटेस गेले असताना पंजाब पासून के मद्रास पर्यत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील. अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात. तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की, तुम्हाला कोणीही मदत करणार नाही व अधिकाऱ्यांची मदत होणार नाही. मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत, याची त्यांना खात्री असते. या तुमच्या असहाय स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलुमाची व अन्यायाची वागणुक करतात. येथ वर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्या शिवाय तुम्हाला या जुलमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही. दुसरी प्रतिकाराला अवश्य असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही. या दोन गोष्टी सिद्ध झाल्या बरोबर तिसरी एक गोष्ट आपोआपच सिद्ध होते आणि ती हि की हे अवश्य असलेले सामर्थ्य तुम्हाला कोठून तरी बाहेरून मिलविले पाहिजे. हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळविता येईल, हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे, आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे.
बाहेरून सामर्थ्य आणले पाहिजे