बहुजन नायक कांशीराम
Bahujan Nayak Kanshiram
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
समाजातील सधन.संपत्तीहिन व ग्रामीण भागात विखुरलेल्या दलित जाती यामध्ये सत्ता संपादन करण्याचे सामर्थ्य व सत्ता स्पर्धेत निर्णायक हस्तक्षेप करण्याचे स्फुलिंग कांशीरामजीनी शोषीतांच्या मनात चेतविले.मतपेटीच्या चलाख राजकारणाच्या आधारे जसे प्रचलित सत्ताधारी पक्ष सत्ता हातात घेतात व आपले नियंत्रण समाज व्यवस्थेवर ठेवतात तसे नियंत्रण आपण का ठेऊ शकत नाही ? सत्ताधाऱ्यांचे हे सुत्र आपणही वापरले पाहिजे ह्या प्रमेयावर कांशीरामजीचे पुढचे राजकारण सरकत गेले. "जिसकी जितनी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी" तसेच “वोट हमारा राज तुम्हारा ये नही चलेगा” ह्या घोषवाक्या द्वारे सत्तेच्या वर्तुळाबाहेरील समाज घटकांना बसपा कडे आकर्षित केले. 15% ( शोषक ) विरुध्द 85% ( शोषीत ) यांचा संघर्ष व त्याची फलश्रुता काय असेल ? हे बहुजनाना समजावून सांगीतले. कांग्रेस ला नागनाथ तर भाजपाला सापनाथ संबोधून बहुजन समाजातील मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केली व दोन्ही पक्षानी पहिल्यांदाच विधानसभेत निर्विवाद बहुमत मिळविले होते.राजकारणात बसपाचा चढता आलेख बघून काग्रेस, भाजपा व कम्यूनिस्ट पक्षातील बड्या बड्या धुरंधराना घाम फुटायला लागला. उत्तर प्रदेशात सपा व बसपा यांच्या निवडणूक युतीने देशात बहुजन समाजाचे ध्रुविकरण केले तर देशाची सत्ता ते काबीज करुन आपल्या परंपरागत सत्तेला सुरुंग लावतील व आपण सत्तेपासून बेदखल होऊ याची भीती सत्ताधारी कांग्रेस व हिंदू संस्कृतीच्या संस्थेचा मालक स्वंयसेवक संघाला झाली. सोबतच पैशाच्या आधारावर कांग्रेस व भाजपाला नाचवून गरीब व सामान्य लोकांना लुबाडणाऱ्या भांडवलदारांना विजेचा झटका बसावा तसे झटके बसत होते. ( उदा. सुश्री मायावती उत्तर प्रदेशात सत्तेवर येताच अंबानी बंधच्या कंपन्यावर टाच आणण्यात आली.खाजगी क्षेत्रात आरक्षणासाठी कायदा करण्यात आला ) त्यामुळेच समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाची युती झाल्याच्या क्षणापासुन मुलायम -कांशीराम, मुलायम - मायावती यांच्या मध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मनूवादी पत्रकार, लेखक व मिडीयाच्या माध्यमातून षडयंत्र रचून छोट्या छोट्या बाबीना फार मोठी प्रसिध्दी देण्यात आली. बसपा व सपा यांच्यात वितुष्ट व शत्रुत्व निर्माण करण्यात अखेर यशस्वीही झालेत.