- भूपेंद गणवीर
दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. उरलेली कसर पुरस्काराची तिथी व वेळ ठरवून काढली. राजकारणात शहकाटशह चालते. त्याची बाधा या पुरस्कारला झाली. महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपुरात वज्रमूठ सभा होती. तिला शह देण्याचं ठरलं. मग तोच दिवस पुरस्कार वितरणाचा ठरविला. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. वेळ ठरली दुपारची. दीड-दोन वाजेपर्यंत पुरस्कार सोहळा संपेल. वीस लाखाची गर्दी दिसेल. तिच्यापुढे वज्रमूठ सभा फिकी पडेल. खेळी यशस्वी होईल. चर्चा होईल महाराष्ट्र भूषण सोहळ्याची. त्या दिवशी लिड बनेल. ती अनेक दिवस चालेल. त्यानूसार गोट्या सरकल्या. हे समयचक्राला मान्य नव्हते. इथंच घात झाला. त्या दिवशी नेमकं उलटं घडलं. अन् उष्माघातात एकावेळी 13 लोकांचा जीव गेला. अनाधिकृत आकडा आणखी जास्त असेल. या नोंदी कळमपूरी व वाशीतील रूग्णालयांतील आहेत . हे दोन्ही रूग्णालय 15 किलोमीटर परिसरातील. अन्य दवाखान्यात दाखल झालेल्यांचे काय झालं. हे कोणाला कळलंच नाही. ते आकडे पुढे येतील. तेव्हा मृत्यूचा नेमका आकडा पुढे येईल. तयारी 20 लाख लोक येणार म्हणून होती. बहुतेक श्रीसेवक असणार असं सांगण्यात आलं. त्या व्यवस्थेसाठी सुमारे 13 कोटी 62 लाख 51 हजार रूपये खर्चाचा बजेट करण्यात आला. तरी व्यवस्था कोलमडली. पिण्याचे पाणी अपुरं पडलं. आरोग्य सेवा मिळाली नाही. अन् लोकांचा बळी गेला. अनेक श्रीसेवक रात्रीच कार्यक्रम स्थळी पोहचले होते. ते उपासीतापाशी होते. तसाच त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला. कडकडत्या ऊनाचे चटके बसले. तिनशेवर लोकांना दवाखान्यात दाखल करावे लागले.अन् महाराष्ट्र भूषणला गालबोट लागलं.
महाराष्ट्रात उष्माघाताने इतकी माणसं एकाचवेळी दगावली. आतापर्यंतच्या इतिहासातील ही पहिली घटना होय. या अगोदरची अशी नोंद नाही. ही घटना घडली. ते स्थळ मुंबईपासून जवळ. नवी मुंबई खारघरात चॅनेलच्या सर्वाधिक पत्रकारांची वस्ती. कार्यक्रमाला झाडून सर्वांनी हजेरी लावली. घटना दुपारी घडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही चॅनेलवर उष्माघाताने मृत्यूची बातमी नव्हती. मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात पोहचले. त्यांनी पहिल्यादा सात-आठ लोक दगावल्याचे चॅनेलवाल्यांसमोर सांगितले. त्यानंतर चॅनेलवर बातम्या झळकल्या. तोपर्यंत एकानेही बातमी दिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने आलेल्या बातम्यांनी खळबळ माजली. तोपर्यंत नागपुरातील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू झाली होती. पुरस्कार सोहळ्यात काय घडलं. कोणाला कानोकान खबर नव्हती. माध्यमांनी सुध्दा आपली भूमिका पार पाडली नाही. उष्माघात बळींच्या बातमीला प्राधान्य दिलं नाही.असं कां व्हावं. हा चिंतेचा विषय आहे. जागृत पत्रकारितेचा अभाव लोकशाहीला घातक असतं असं म्हणतात. त्याची प्रचिती उष्माघात घटनेतील वृत्त संकलन उदासितेने पुन्हा एकदा समोर आली.
- भूपेंद गणवीर