मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाला यश
गडचिरोली - गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ओबीसीसाठी सहाय्यक प्राध्यापकांची ९ पदे राखीव ठेवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या प्रयत्नास यश प्राप्त झाले आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी ३० सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी २० मार्च २०२० ला जाहिरात प्रकाशित करून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागितले होते. परंतु या जाहिरातीमध्ये ओबीसीसाठी एकही जागा नसल्यामुळे ओबीसी उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी व सरकार विरोधी तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली होती. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून चौकशीची मागणी केली होती. शेवटी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेत या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने डॉ. बबन तायवाडे, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रवीण घोसेकर, विशाल पानसे व इतर यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र शासन, गोंडवाना विद्यापीठ आणि इतर विरुद्ध रिट याचिका क्रमांक १८५६/२०२० दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने नुकताच निकाल दिला असून त्यात ओबीसी प्रवर्गाला ९ सहाय्यक प्राध्यापकांची पदे राखीव ठेवण्याचे आदेश गोंडवाना विद्यापीठाला दिले आहे.
ही याचिका दाखल करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर अॅड. गोविंद भेंडारकर, प्राचार्य डॉ राजेश मुनघाटे, प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर म्हशाखेत्री डॉ. एन. एच. कोकोडे, सतीश विधाते, डॉ. सुरेश लड़के, पांडुरंग नागापुरे यांचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य लाभले आहे.
खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची नांदी - प्रा. येलेकर
विशेष म्हणजे ज्या कायद्यामुळे ओबीसींना हे आरक्षण मिळाले तो केंद्रीय शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) कायदा २०१९, हा महाराष्ट्र राज्यात लागू होण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी प्राध्यापक संघटनांनी अथक परिश्रम घेतले होते, त्यामुळेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था आरक्षण कायदा २०२१ अस्तित्वात येऊन ओबीसी सह इतर प्रवर्गातील उमेदवारांना प्राध्यापक होण्याची संधी मिळाली अन्यथा पुढील १५० वर्ष ते प्राध्यापक होण्यापासून वंचित राहिले असते. प्राध्यापकपदभरती मध्ये संवर्गनिहाय आरक्षण ही खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची नांदी असल्याचे प्रा. शेषराव येलेकर यांनी म्हटले आहे.