दिनांक एक ऑगस्ट दोन हजार बावीस ला संविधान चौक नागपूर येथून सुरू झालेल्या मंडल यात्रेचा कालत्र दिनांक सात ऑगस्ट दोन हजार बावीस ला दीक्षाभूमी येथे समारोप होऊन, सक्करदरा नागपूर येथील सेवादल महाविद्यालयाच्या सभागृहात समारोपीय कार्यक्रमाची सांगता झाली. ही ऐतिहासिक मंडल यात्रा अनेक अर्थाने ओबीसीच्या चळवळीस बळ देणारी ठरावी असे एकूणच मंडल यात्रेच्या फलद्रूपतेवरुन दिसायला लागते.
ओबीसी तरुणांची प्रेरणादायी मंडल यात्रा विदर्भातील नागपूर येथून मौदा- जवाहरनगर- भंडारा- मोहाडी- तुमसर- सिहोरा- तिरोडा- गोंदिया- गोरेगाव- सडक अर्जुनी- नवेगाव बांध- कनेरी- अर्जुनी मोरगाव- वडसा- ब्रह्मपुरी- नागभिड- सिंदेवाही- मूल- चिचपल्ली- बल्लारपूर- चंद्रपूर- वडगाव- ताडाळी- भद्रावती- वरोरा- वणी- मारेगाव- यवतमाळ-देवळी- सावंगी मेघे- वर्धा पवनार- या मार्गे नागपूर दीक्षाभूमी अशी मार्गक्रमण करीत विदर्भातील ओबीसींना जागृती करून दिली.
मंडल यात्रेने ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीचे लाभ, वस्तीगृह फी वाढ, शैक्षणिक मार्गदर्शन यासह शेतकरी आणि ग्रामीण ओबीसी बांधवांना मंडलच्या शिफारशींचे महत्त्व समजावून सांगितले. ही उल्लेखनीय बाब ओबीसी नवपिढीसाठी फार बहुमोलाची ठरावी.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. नागेश चौधरी यांनी मांडलेली भूमिकाही विचारात घेणे खूप आवश्यक ठरते. ते म्हणतात,ओबीसीची गुलामगिरी बळकट ठेवण्यासाठी जी व्यवस्था कारणीभूत आहे ती समजून घेऊन लढ्याची दिशा ठरवली पाहिजे. चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीव्यवस्था आणि स्त्री-पुरुष विषमता शाबूत ठेवण्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्यांचे मनसुबे किती खतरनाक आहेत याकडे ओबीसींनी डोळ्यात तेल घालून सावध राहण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी सात ऑगस्ट हा दिवस ओबीसींचा राष्ट्रीय सण म्हणून यापुढे होणार असल्याची घोषणा केली. सात आगस्ट हाच ओबीसींचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होईल अशा प्रकारची गर्जना त्यांनी याप्रसंगी करून ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आणि विचारवंतांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. ओबीसी लढ्यातील प्रमुख नेते बळीराज धोटे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, नितेश कराळे, विलास काळे उमेश कोरराम, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, खेमेंद्र कटरे, प्रा रमेश पिशे, ज्ञानेश्वर रक्षक, डॉ.अंजली साळवे,स्वागताध्यक्ष संजय शेंडे, ईश्वर बाळबुधे, संध्या राजूरकर, प्रा.अनिल डहाके, दीनानाथ वाघमारे यांनीही ओबीसींच्या वैचारिक लढ्याची पाठराखण केली. फुले शाहू आंबेडकर विचारधारा, ओबीसीची तमिळनाडूमधील चळवळ आणि द्रमुक चे कार्य ओबीसी चळवळीचा प्राण आहे. तर अवैदिक परंपरा, वारकरी संत संप्रदाय आणि सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ही खऱ्या अर्थाने ओबीसींची मुक्तिदायी परंपरा होय. ओबीसीवर होणारा अन्याय, शोषण समजून घेण्यासाठी या देशातील समतावादी विचारांचे पाईक झाल्याशिवाय ओबीसी ला पर्याय नाही. ओबीसीच्या जागृत बांधवांचे हे विचार ओबीसी तळागाळापर्यंत सामान्य बांधवांपर्यंत पोचविण्याची सर्वांनी या प्रसंगी मनीषा व्यक्त केली. गेली सुमारे तीस-पस्तीस वर्षे नेटाने ओबीसी जागृतीचे काम करणारे असंख्य कार्यकर्ते विचावंत आहेत त्यांच्या कार्याचा प्रातिनिधिक स्वरूपात क्रुतज्ञतापूर्वक सन्मान मा. नागेश चौधरी, प्रा. नामदेवराव जेंगठे, प्रा. शाम झाडे, भाऊराव राऊत, शैल जेमिनि, यामिनी चौधरी, सुनिता काळे,संध्या राजूरकर, नूतन माळवी, संध्या सराटकर, छाया कुरटकर, डॉ. अशोक चोपडे, अनुज हुलके, पांडुरंग काकडे, गोविंद वरवाडे, डॉ. गुरुदास येडावार,यशवंत सराटकर, विजय बाभुळकर आदि सन्माननीय व्यक्तींचा सत्कार करून ओबीसींचा कार्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. मंडल यात्रेतील संयोजक उमेश कोरराम आणि सहभागी सर्व चमूनी गत सप्ताहात अपार कष्ट घेऊन मंडल यात्रेचे आयोजन केले. त्यांची प्रशंसनीय कामगिरी ओबीसीला प्रेरणादायी ठरणारी आहे. समारोपीय याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद अडेवार, सूत्रसंचालन वंदना वनकर आणि संतोष मालेकर यांनी केले.