धरणे आंदोलन करून मंडल दिन साजरा
औरंगाबाद : ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी ओबीसी चळवळीतील विविध संस्थासंघटनांनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मंडल दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, १० ऑगस्टला विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले जाणार आहे. नॉन पॉलिटिकल ओबीसी, एससी-एसटी सोशल फ्रंट, पिछडा ओबीसी शोषित संघटन, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, बंजारा पँथर पार्टी, सत्यशोधक ओबीसी परिषद, प्रबुद्ध युवा परिवर्तन मंचने आंदोलनात सहभाग घेतला होता.
भारतीय पिछडा (ओबीसी) संघटना
मंडल दिनानिमित्त भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेच्या वतीने फुले दांपत्याच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ओबीसी लोकसंख्या जाणीवपूर्वक कमी दाखवल्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यातील आरक्षणालाही फटका बसू शकतो. त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या जाणून घेण्यासाठी २०२२ च्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम वाढवावा व जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकार करत नसेल तर राज्य सरकारने ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस जी माचनवार, विभागीय अध्यक्ष प्रा. सुदाम चिंचाने, विभागीय सचिव डॉ कालिदास भांगे, डॉ देवराज दराडे, डॉ वसंत हारकळ, डॉ प्रभाकर गायकवाड, डॉ राजू पोपळघट, डॉ रामकिशन मुंडे, जनार्दन कापुरे, अमोल वाघमारे, जगन अंभोरे, सरस्वती हारकळ आदींची उपस्थिती होती.