ओबीसींना उमेदवाऱ्यांची भीक नको ! हक्काचे ओबीसी आरक्षण द्या

ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांची भूमिका

     मुंबई : ओबीसी प्रश्नी राजकिय पक्षांच्या उमेदवारीची भिक नको. आम्हाला आमचे घटनात्मक आरक्षण हवे आहे अशी माहिती ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली. याप्रश्नी सोमवारी प्रकाश शेंडगे यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. हा तिढा केंद्र सरकारने लक्ष घालून सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,उपाध्यक्ष जे डी तांडेल, प्रा. टी. पी. मुंडे , ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे सहभागी होते.

prakash_shendge_meeting_with_Ramdas_Athawale_on_obc_reservation    ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात ४ मे २०२२ ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर सर्व पक्षात ओबीसींना आरक्षित जागा देण्याची स्पर्धा सूरु झाली.सर्वप्रथम भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी २८ टक्के ओबीसींना तिकीट देण्याची घोषणा केली व त्यांना प्रतिउत्तर म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २७ टक्के पेक्षा जास्त जागा ओबीसींना देण्याचे वक्तव्य केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेनी अजून भूमिका जाहीर केली नाही याकडे लक्ष वेधून शेंडगे म्हणाले, अशी भीक आम्हा ओबीसींना नको आहे. आम्हाला घटनेने दिलेले हक्काचे आरक्षण हवं आहे आणि हे आरक्षण रद्द होण्यात सर्वच पक्षांनी भूमिका वठवली आहे.