साहित्यिकांनो, निर्भीडपणे लेखन करा : अरुणा सबाने
चंद्रपूर : आतापर्यंत ओबीसी महिलांना संधी मिळत नव्हती. आता फार मोठ्या प्रमाणात ओबीसी महिला लिहायला लागल्या, त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. लेखन करायचे असेल तर फार मोठ्या प्रमाणात वाचन करणे आवश्यक आहे. आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे, तरीसुद्धा साहित्यिकांनी निर्भीडपणे लेखन करणे गरजेचे आहे, असे परखड मत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी व्यक्त केले. त्या फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य-संस्कृती संवर्धन समिती नागपूरच्या वतीने चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित तिसऱ्या फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
मशाल प्रज्वलीत करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी जाकीर हुसेन कॉलेज दिल्लीचे डॉ. लक्ष्मण यादव, युवा नेत्या शिवानी वाडेट्टीवार, माजी संमेलनाध्यक्ष व झाडीबोली कवयित्री अंजनाबाई खुणे, राहुल खांडेकर, ज्येष्ठ समाजसेविका प्रभा वासाडे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अँड.अंजली साळवे विटनकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दत्ता हजारे, मिलिंद फुलझेले, श्रीगुरुदेव युवा मंचचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक व संमेलनाच्या मुख्य प्रवर्तक प्राचार्य संध्या राजुरकर आदींची उपस्थिती होती.