नागपूर, १७ एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेत दुरुस्ती करावी आणि एससी, एसटींची जशी जनगणना होते, त्या पद्धतीने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. १९५० पासून कोणत्याही सरकारने ओबीसींची जगनणना केलेली नाही. त्यामुळे ती होणे गरजेची असल्याचे बावनकुळे म्हणाले.
ओबीसी समाजाने आता एकजुटीने राजकीय आरक्षणाची मागणी केली पाहिजे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन आपण सर्वांनी एकत्रितरीत्या केंद्र सरकारकडे ही मागणी करावी, असेही बावनकुळे म्हणाले. सर्वच समाजातील लोकांनी केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
वेगवेगळ्या सार्वजनिक उद्योग आणि शासकीय सेवांचे आता खाजगीकरण केले जात असून, अशाने भविष्यात सर्व नोकऱ्या खाजगी क्षेत्रात जातील. खाजगी क्षेत्रात आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही, अशी भीतीही नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखविली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात काँग्रेस आणि भाजपच्या विदर्भातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली.