हरिभाऊ राठोड यांचे आवाहन; इम्पिरिकल डेटा गोळा करा.
मुंबई : ओबीसी आरक्षण आपल्या हक्काचे आहे; त्यासाठी शेवटपर्यंत लढा द्या, असे आवाहन ओबीसी आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी केले. ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी हरिभाऊ राठोड म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण राज्य सरकारच्या चुकांमुळे गेले आहे. आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर राज्य सरकारने इम्पिरकल डेटा गोळा करावा. ओबीसीमध्ये सुमारे २५०० जातींचा समावेश असून, फक्त २७ टक्के आरक्षण आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणे महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका. रोहिणी आयोगाचा अहवाल केंद्राने तातडीने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मेळाव्याला लालमणी राजभर, डॉ अरविंद केशव, तुंबरे कहार, हरिदास महाराज गंगाखेडकर, प्रकाश राठोड, मूर्ती भाऊराठोड, नंदू पवार, जयकुमार राठोड, महेश भाट, सुधीर राठोड, सुनीता जाधव, राजेश चव्हाण, रवी चव्हाण, अप्पा भालेराव आदी उपस्थित होते.