घनसावंगी - ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे, तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका घनसावंगी येथील तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक - ०७ रोजी भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मंजुषा कोरडे व अन्य मुलींच्या हस्ते नायब तहसीलदार गौरव खैरनार यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील एमएसईबी कार्यालय ते बँक ऑफ महाराष्ट्र मार्गे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी असलेले हजारो महीला व नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत घोषणा दिल्या. यावेळी ओबीसी समाजाला मिळालेले २७ टक्के आरक्षण आबाधित राहावे तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, महाज्योती संस्थेला सारथी प्रमाणे तात्काळ निधी देण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चानंतर प्रा. चुनीलाल जाधव, प्रा. भगवानसींग डोभाळ यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन तुळशीरामजी कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शाम भोसले यांनी मानले.