पुणे - दरवर्षीप्रमाणे जेजुरीगड येथे ओबीसी दसरा मेळाव्याचे आयोजन जय मल्हार सांस्कृतिक सभाग्रह जेजुरी येथे करण्यात आले होते. सर्वच प्रस्थापित पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी ओबीसीची केलेली कोंडी फोडायची असेल तर ओबीसी चा स्वतःचा हक्काचा पर्याय पर्याय निर्माण करण्याच्या भूमिकेवर विचार करण्याची वेळ आलेली आहे. ओबीसी, व्हीजेएनटीमध्ये ८५ हून अधिक संघटना कार्यरत आहेत. परंतु ओबीसी समूहाला प्राधान्य देऊन काम करणारा हक्काचा कोणताच पक्ष नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र येऊन राजकीय पर्याय उभा करणार असल्याचे प्रतिपादन दसरा मेळावा संयोजन समितीचे आयोजक नवनाथ पडळकर यांनी केले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ चितळकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व ओबीसी चळवळीचे प्रणेते श्रावण देवरे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मध्ये सुधाकर राव आव्हाड, राजाराम पाटील, आप्पासाहेब आखाडे, अशोकराव कोळेकर, डॉक्टर विष्णुपंत गावडे आदी मान्यवर होते.
यावेळी ओबीसी व्हिजे, एनटी, एसबीसी समाजाला एकत्र करून व मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊन राज्यात आता स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करावी. त्याचे स्वरूप ठरविण्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय बैठका घेऊन शेवटी मुंबईत निर्णयाची घोषणा करण्यात येईल. महाराष्ट्रात ओ बी सी भटके-विमुक्त एसबीसी जोडो अभियान राबविणार. त्यासाठी राज्यभर जनजागर रथयात्रा काढून राज्यातील विविध जाती जमातीच्या संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच महाज्योतीचा निधी, मागसवर्गीय आयोगाचा निधी, धनगर समाजाच्या १३ विकास योजनांसाठी चा एक हजार कोटीचा निधी या बाबी मिळवण्यासाठी ओबीसी भटके-विमुक्त धनगर समाज आता एकत्रितपणे लढा लढणार असल्याचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार आंधळे यांनी केले. तर आभार नवनाथ पडळकर यांनी मानले. यावेळी विजय बोडेकर भगवानराव जराड जगन्नाथ पैकेकरी धोंडीराम मलगुंडे, रामदास महानवर, राजु गोडे, दत्तात्रय गवते , अरविंद एलपले , सुनील गोटखिंडे, विक्रम माळवदकर, अनिकेत भालेराव, रवींद्र सोलंकर आदी मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे आयोजन दसरा मेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी केले.
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष ओबीसी आरक्षण विरोधी : प्रा. श्रावण देवरे सर्वच ४ प्रस्थापित पक्ष ओबीसीच्या राजकीय आरक्षण विरोधी आहेत. हे या प्रस्थापित पक्षांच्या भूमिकेतून दिसत आहे म्हणून येत्या काळात ओबीसीला तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसी केंद्री पर्यायी व्यासपीठ उभे करण्याची गरज व्यक्त केली. सर्व प्रस्थापित पक्षांनी तसेच विस्थापित, वंचित पक्षांनी देखील ओ बी सी चा वापर करून ओबीसीला वाऱ्यावर सोडले. म्हणून आता ओबीसी केंद्री राजकारण उभे करावे लागेल अशी भूमिका यावेळी ओबीसी चळवळीचे नेते प्रा. श्रावण देवेरे यांनी मांडली.