यवतमाळ : ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील १८ ते ३० वयोगटातील युवक-युवतींमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, नेतृत्वगुण, सत्यशोधक दृष्टीकोन आणि सामाजिक जाणीवा निर्माण करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठात पाच दिवसीय मोफत निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मोहा फाटा, धामणगाव रोड, यवतमाळ येथील विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात येणार असून इच्छुक युवक-युवतींनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना केवळ व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षणच नव्हे तर जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्व यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिरातील अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, वेळेचे आणि कामाचे प्रभावी व्यवस्थापन, आत्मविश्वास वृद्धी, सत्यशोधक दृष्टीकोन, जीवन जगण्याची कला, तणाव व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, प्रभावी मुलाखत तंत्र, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय संतांचे समाजजागृती कार्य, प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा अभ्यासही सहभागी विद्यार्थ्यांना करून दिला जाणार आहे.
याशिवाय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडी, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये, सामाजिक न्यायाची संकल्पना तसेच नवभारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वक्षमतेचा विकास होण्यास मदत होणार आहे.
महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारा हा सेवाभावी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क आहे. सहभागी विद्यार्थ्यांसाठी निवास व प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबिराची पुढील बॅच रविवार, २१ जून २०२६ ते गुरुवार, २५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मर्यादित प्रवेशसंख्या असल्याने इच्छुकांनी तातडीने संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश नोंदणीसाठी आधार कार्ड (रहिवासी पुरावा), शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) याची छायाप्रत तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक राहील. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले काही साहित्य विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात येणार असून ते घेणे इच्छुकांवर अवलंबून असेल. प्रवेशाबाबत नियामक समितीचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी डॉ. ज्ञानेश्वर गोरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) – ९४२२१६५१८७, माया गोरे (संचालिका) – ९८९०५८६६२२, अरविंद माळी (सत्यशोधक प्रबोधनकार व कार्यकारी संचालक) – ९४२२८३११६६ तसेच विलास काळे (निर्देशक) – ८२७५७३७५५५ यांच्याशी संपर्क साधावा.