जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; आजरा तालुका ओबीसी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

     आजरा, ता. २८ : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे नोंद व्हावी यासाठी जनगणना फॉर्ममध्ये स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, अशी ठाम मागणी आजरा तालुका ओबीसी संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून केंद्र सरकारचे लक्ष या महत्त्वाच्या विषयाकडे वेधण्याची मागणी केली.

Demand for separate column for OBC in census Ajra Taluka OBC organization submits a statement to the Tehsildar

     संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशातील विविध समाजघटकांची अचूक लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र, प्रस्तावित जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था नसल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     निवेदनात पुढे म्हटले आहे की, जनगणनेमध्ये विविध जाती व प्रवर्गांसाठी स्वतंत्र कॉलमची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम न देता ‘इतर’ किंवा सामायिक वर्गवारीत त्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंधीची अचूक माहिती उपलब्ध होणार नाही. याचा परिणाम भविष्यातील शासकीय धोरणे, आरक्षण, विकास योजना आणि विविध कल्याणकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीवर होऊ शकतो, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.

     ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनगणनेत स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यासाठी आजरा तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. २९) तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या आंदोलनात तालुक्यातील ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

     निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये कॉ. शिवाजी गुरव, कॉ. महादेव सुतार, कॉ. विष्णू केसरकर, रघुनाथ शिंदे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी सहभाग घेतला. शासनाने ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी तातडीने मान्य करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.