Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार

लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


     माझ्या माहितीप्रमाणे या रूढींच्या उगमांचे शास्त्रीय स्पष्टीकरण अजूनही पुढे आलेले नाही. या रूढींना मान का देण्यात आला हे सांगणारे तत्त्वज्ञान आपणाकडे विपुल प्रमाणात आहे परंतु त्यांच्या उगमाची व अस्तित्वाची कारण सांगणारी कोणतीही माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. सतीप्रथेला मान देण्यात आला; कारण *  "पती आणि पत्नी यांच्या शरीर व आत्माच्या निस्सीम एकत्वाचे ते एक गमक आहे. सती जाणे म्हणजे मृत्यूच्या सीमा ओलांडणारी भक्ती होय. कारण पत्नीपदाचा उच्च आदर्श तोच असल्यामुळे पार्वती शंकराला म्हणते : पतीभक्तीने स्त्रीला सम्मान प्राप्त होतो. यापुढे ती अत्यंत भावनावश आवाजात म्हणते हे शंकरा जर माझ्या सहवासाने तुम्ही संतुष्ट झाला नाही तर नंदनवनही मला तुच्छ वाटेल." सक्तीच्या वैधव्‍याला मान का देण्यात येतो हे मला तरी माहीत नाही. आणि बरेच लोक या प्रथेला चिकटन असले तरी तिच्या गौरवाची गाणी गाणारा अजूनही मला कोणी आढळला नाही. बालविवाहाची प्रशंसा डॉ. केतकरांनी पुढीलप्रमाणे केल्याचे ऐकिवात आहे. "खऱ्या एकनिष्ठ पुरुषाला किंवा स्त्रीला तिचे किंवा त्याचे लग्न ज्या व्यक्तीशी झाले असेल तिच्याशिवाय अन्य व्यक्तीबद्दल प्रणय भावनिर्माण होता कामा नये. अशाप्रकारची शुद्धता ही केवळ लग्नानंतरच आवश्यक आहे असे नव्हे तर लग्नाआधीही आवश्यक असते. कारण आदर्श पातिव्रत्याचे हेच शुद्ध स्वरूप होय. कुमारिकेच्या नियोजित पतिशिवाय जर ती लग्नाआधीच दुसऱ्यावर प्रेम करीत असेल तर तिला विशुद्ध समजता येत नाही. लग्न कोणाशी होणार आहे हे कुमारिकेला माहीत नसते म्हणून लग्नापूर्वी तिने कोणावरही प्रेम करू नये. जर तिने तसे केले तर ते पाप ठरते. म्हणनच तिच्यामध्ये कसल्याही लैंगिक भावनेची जाणीव निर्माण होण्यापूर्वीच जर तिला तिचे प्रेमपात्र माहीत असेल तर अधिकच चांगले ठरते. यामळेच अल्पवयीन मुलीचे लग्न करणे उत्तम"

B. R. Ambedkar Book Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar      हा उसन्या अवसानाने केलेला चातुर्यपूर्ण वाक्छल बालाविवाहपद्धती सन्मानीत कशी झाली हे सुचवितो; परंतु ही पद्धती व्यवहारात का आणल्या गेली याबद्दल काहीही सांगत नाही. १८ व्या शतकातील व्यक्तिस्वातंत्र्यवादाच्या उदयाशी ज्याचा थोडाही परिचय असेल त्याच्या लक्षात माझ्या अभिप्रायातील मर्म येईल. इतर आनुषंगिक बाबीपेक्षा चळवळ नेहमी जास्त महत्वाची असते. आणि तिला नैतिक बळ देण्यासाठी व समर्थनासाठी बऱ्याच काळानंतर तिच्याभोवती तत्वज्ञान निर्माण होत असते. याच सूत्राने पुढे  जाऊन मी सांगू इच्छितो की या रूढीची ही भरमसाठ प्रशंसा लक्षात घेता अशा स्तुतीशिवाय त्या तग धरून राहू शकत नाहीत हेच सिद्ध होते. या रूढी निर्माण का झाल्या या प्रश्नाचे माझे उत्तर असे की जातीच्या घडणीसाठी त्या आवश्यक होत्या आणि त्यांना लोकप्रिय करण्यासाठी किंवा कडू गोळीला साखरेचा मुलामा देण्यासाठी असे म्हणूया, त्यांच्या गौरवाचे तत्वज्ञान निर्माण झाले. कारण आरंभी निरागस लोकांच्या विवेक बुद्धीला या रूढी इतक्या किळसवाण्या व भयंकर वाटल्या असतील की त्यांना मोहक रूप देण्यासाठी बरेच परिश्रम घेण्यावाचून गत्‍यंतर उरले नाही. या रुढी आज आपल्यासमोर उत्कृष्ट आदर्शाच्या रुपात मांडण्यात येत असल्या तरी मूलतः त्यांची प्रकृती साधनांचीच आहे. तथापी त्यांच्यामुळे घडून येणारे परिणाम समजून घेण्यात आपली दिशाभूल होऊ नये. साधनांना साध्यरुप मानणे आवश्यक असते व या रूढींच्या बाबतीत त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी तसे करणे भाग पडले, असा युक्तीवाद कोणी सहज करू शकेल. जर साधनाची खरी प्रकृती नष्ट होत नसेल तर साधनाला साध्य समजल्याने काहीच अपाय होत नाही; परंतु यामुळे एखाद्या साधनाचे साधनरूप मात्र नाहीसे होत नाही. तुम्ही साधनाला ज्याप्रमाणे साध्य मानू शकता त्याचपध्दतीने 'जगातील सर्व मांजरे कुत्री आहेत' असा कायदाही तुम्ही पास करू शकता; परंतु जसे मांजरांचे रूप बदलून त्यांना तुम्ही कुत्र्याचे रूप देऊ शकत नाही तसेच साधनाचे रूपही तुम्ही बदलू शकत नाही म्हणूनच सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाहाला साध्य समजण्यात येवो की साधन समजण्यात येवो मूलतः या रुढी वाढीव पुरुष व वाढीव स्त्रीचा प्रश्न सोडविण्याच्या हेतूने व अंतर्गत विवाहाची रूढी शाबूत ठेवण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आल्या, हे माझे म्हणणे समर्थनीय ठरते. या प्रथांवाचून अंतर्गत विवाह पध्दती तंतोतंतपणे कार्यशील राहू शकली नसती आणि अंतर्गत विवाह पध्दतीवाचून जात म्हणजे एक फसवणूक होय.

     भारतातील जातीच्या निर्मितीची व जोपासनेची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतर साहजिकच तिच्या उगमासंबंधीचा प्रश्न पूढे येतो. हा उगमा संबंधीचा प्रश्न अतिशय त्रस्त करणारा आहे. व दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीचा अभ्यास करताना त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. काहींनी त्याच्याकडे कानाडोळा केला तर काहींनी त्याला बगल दिली आहे जातीचे मूळ यासारखी काही वस्तू असू शकते की काय याबद्दल काही संशोधक गोंधळून जाऊन असे सुचवितात की 'मूळ' या शब्‍दाची आपली आसक्ती आपण आवरू शकत नसलो तर त्याच्या अनेकवचनी रूपाचा म्हणजे 'उगमस्थान' असा वापर करणे अधिक चांगले. माझ्यापुरते पाहिले तर माझ्या मनात भारतातील जातीच्या उगमाच्या प्रश्नाने कसलाही गोंधळ नाही. कारण मी आधीच सिध्द केल्याप्रमाणे जात्यंतात विवाह हेच एकमेव जातीचे वैशिष्टय होय. आणि जेव्हा मी 'जातीचे मळ' असे म्हणतो तेव्हा 'जात्‍यंर्गत विवाहासाठी लागणाऱ्या यंत्रणेचे मुळ' असा त्याचा अर्थ मला अभिप्रेत आहे.

     समाज जीवनात व्यक्तीला एखाद्या परमाणूचे स्थान देणारी कल्पना राजकीय व्याख्यानातून बरीच लोकप्रिय करण्यात आली आहे. (गावंढळ बनविण्‍यात आली असे म्हणण्याच्या बेतात मी होतो) परंतु ती एक भूलथाप आहे. व्यक्तीच्या समूहाने समाज बनतो असे म्हणणे फारच मामुली विधान ठरते. समाज हा नेहमीच वर्गाच्या समावेशाने तयार होतो. वर्गलढ्याच्‍या विचारसरणीचे प्रतिपादन कदाचित अतिशयोक्तीचे होईल परंतु समाजामध्ये निश्चित असे वर्ग अस्तित्वात असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा आधार वेगवेगळा असू शकतो. ते आर्थिक, बौध्दिक किंवा सामाजिक असतील परंतु समाजातील व्यक्ती ही नेहमीच कोणत्यातरी वर्गाचा घटक असते. ही सर्वमान्य वस्तुस्थिती असून हिंदूसमाजही या नियमाला अपवाद नसावा आणि खरी गोष्ट अशी की तो तसा नव्हता हे आपण जाणतोच. हा सामान्य नियम आपण ध्यानात धरला तर जातीच्या उगमाविषयी आपला अभ्यास अधिक सुकर होईल. म्हणून जातीमध्ये ज्याचे प्रथम रूपांतर झाले असा वर्ग कोणता हेच आपणास ठरवावयाचे आहे. कारण जात व वर्ग हे दरवाजासमोर दरवाजा असलेले शेजारी असून फारच थोड्या भेदामुळे त्यांचे अस्तित्व वेगळे ठरते. जात हा एक स्‍वयंमर्यादित वर्ग होय.


*A.K-Coomaraswamy Sati: a Defence of the Eastern Women in the British Sociological Review Vol. VI. 1913.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209